भारतीय संस्कृतीचे अग्रदूत - स्वामी विवेकानंद

 

स्वामी विवेकानंद म्हणजे भारतीय संस्कृतीचे अग्रदूत. वेदांताचे गाढे अभ्यासक. योगाचे प्रचारक. युवकांचे आजच्या या भाषणांमधून स्वामी विवेकानंदांच्या काही मूलभूत गुणांविषयी मी आपणासमोर माझे मत मांडणार आहे.

swami vivekanand, swami vivekanand marathi bhashan
swami vivekenend


 सर्वात पहिला स्वामीजींचा गुण म्हणजे ते अत्यंत तर्कनिष्ठ होते. जी गोष्ट तर्काने पटणार नाही, ती गोष्ट त्यांनी कधीही मान्य केली नाही. याबाबतीत त्यांच्या लहानपणाचा एक प्रसंग आहे. एके दिवशी ते आणि त्यांचे मित्र त्यांच्या दारातल्या चाफ्याच्या झाडाच्या फांदीला लटकत होते. आता चाफ्याचे झाड हे थोडंसं कमजोर असल्यामुळे त्याच्या फांद्या लवकर तुटतात. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना भीती घालायची ठरवली. ते म्हणाले की, "अरे या झाडावर भूत असते. झाडावर चढू नका."  भुताचे नाव ऐकल्याबरोबर त्यांची सर्व मित्र पळून गेले. परंतु स्वामी विवेकानंद पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच फांदीला लटकायला लागले. त्यावेळेला ते त्यांचे मित्र आले आणि म्हणाले "अरे इथे तर भूत असतं लटकू नको." त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणाले, "अरे जर भूत असतं तर आतापर्यंत आपण रोज लटकतोय, केव्हा तरी त्याने येऊन आपल्याला पकडले असते की नाही." ही त्यांच्या तर्क तर्कनिष्ठेची ही साक्ष आहे. आयुष्यभर ते प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासूनच घेत.

 त्यांनी आयुष्यात कधीही नीतिमत्ता सोडली नाही. एके दिवशी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्या सर्व शिष्यांना असं सांगितलं की, "तुमच्या घरी जेव्हा तुमच्याकडे कोणीही पाहणार नाही अशावेळी गुपचूप एक मूठभर तांदूळ घ्या आणि आश्रमात घेऊन या." दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व शिष्यांनी मूठभर तांदूळ आणून गुरुला दिले, परंतु स्वामीजी रिकाम्या हाताने परत आले. त्यावेळेला रामाकृष्ण परमहंस आणि त्यांना सांगितलं, "तू का रिकाम्या हाताने परत आलास?" त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणाले, "ज्या ठिकाणी मला कोणी पाहणार नाही आणि गुपचूप मी तांदूळ घेऊन येईल अशा प्रकारची जागाच मला सापडली नाही. कारण घरामध्ये कोणीही नव्हतं, तरी माझ्या आत बसलेला मी तो मला पाहत होता. त्यामुळे मला तांदूळ आणता आले नाहीत." अशा प्रकारचं त्यांचं तर्कनिष्ठ वर्तन होतं

शिकागोच्या भाषणानंतर स्वामी विवेकानंदांची प्रचंड प्रसिद्धी झाली. त्या वेळेला एक मुलगी स्वामी विवेकानंदांकडे आली. ती त्यांना म्हणाली, "स्वामीजी मला तुमच्यासारखा मुलगा हवा आहे". त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणाले, "ठीक आहे." तर ती मुलगी म्हणाली, "त्यासाठी मला तुमच्याशी लग्न करावं लागेल." स्वामी विवेकानंद म्हणाले, "मुलगा होण्यासाठी लग्न करण्याची काय गरज आहे? लग्नाशिवाय सुद्धा मी तुम्हाला मुलगा देऊ शकतो." त्या मुलीच्या मनामध्ये लाडू फुटले. तिला वाटलं आता आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार. तिने विचारलं, "लग्न शिवाय मुलगा कसं काय होईल?" त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणाले, "लग्न केलं आणि आपल्याला मुलगा झाला तरी तो अगदी हुबेहुब माझ्यासारखाच असेल, याची काही शाश्वती देता येत नाही, परंतु त्यापेक्षा एक काम करा तुम्ही मलाच स्वतःचा मुलगा माना म्हणजे झाले." त्यांनी नीतिमत्ता कधीही सोडली नाही.

 मेवाडच्या राजाकडे स्वामीजी पाहुणे म्हणून गेले होते. स्वामीजींच्या स्वागतासाठी म्हणून त्यांनी काही नृत्य करणाऱ्या नृत्यांगना बोलावल्या होत्या. त्यांचे नृत्य चालू होते. त्यावेळेला स्वामी विवेकानंद त्या सभागृहातून उठून जाऊ लागले. राजाने विचारलं, "स्वामीजी तुमच्यासाठीच हे सगळं आयोजन आहे. तुम्ही का निघून चाललात." त्यावेळेला स्वामीजी म्हणाले, "एखाद्या व्यक्तीच्या मनोरंजनासाठी दुसऱ्या व्यक्तीने नाचणं हे मला पटत नाही त्यामुळे मी तो नाच बघू शकत नाही."

स्वामीजी ज्यावेळेला आजारी होते त्यावेळेला त्यांच्या 39 वर्षाच्या वयामध्ये त्यांना 31 प्रकारचे आजार होते. अशा काळामध्ये कोणीतरी त्यांची सेवा करणारा असावा, म्हणून त्यांचे मित्र त्यांच्या आईला आश्रमामध्ये घेऊन आले. आश्रमाचा नियम असा होता की, आश्रमामध्ये कुठल्याही प्रकारची स्त्री कधीही येणार नाही. परंतु आई त्या ठिकाणी आलेली बघून त्यांना खूप वाईट वाटले. राग आला. त्यावेळी त्यांनी शिष्यांना म्हटलं, "यांना आत्ताच्या आत्ता घरी नेऊन घाला." तर त्यांचे मित्र म्हणाले, "अहो यांना तुमची सेवा करण्यासाठी आणलेलं आहे. त्या तुमच्या आई आहेत. कोणतीही इतर स्त्री नाही." तरीसुद्धा स्वामीजी म्हणाले "नियम सर्वांना सारखेच. आई इथून गेलीच पाहिजे." त्यांची आई त्या ठिकाणाहून निघून गेली. नंतर दोनच दिवसांनी स्वामीजींचा मृत्यू झाला.

 सेवा हे त्यांच्या जीवनाचं सर्वात महत्त्वाचं तत्व होतं. स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आजही रामकृष्ण मिशन जिथे जिथे गरजूंना मदत करत आहे. स्वामीजींच्या पित्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. अशा वेळेला परिस्थिती इतकी बिकट निर्माण झाली की, खूप वेळेला घरामध्ये पुरेसं खायला नसायचं. अशावेळी घरात सगळे जेवायला बसल्यानंतर, माझं पोट भरले. मी जेवण केले. असं खोटं सांगून स्वामी विवेकानंद झोपून घेत. परंतु घरातल्यांना कधी कोणाला त्रास होऊ देत नसत. ही सेवावृत्ती त्यांच्या अंतकरणात लहानपणापासून होती.

 विद्यार्थ्यांनी घेण्यासारखा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांची चित्त एकाग्रता. कोणत्याही गोष्टींमध्ये एकदा त्यांनी चित्त एकाग्र केलं की. बिलकुल त्या गोष्टीचा फडशा पाडल्याशिवाय ते मागे हटत नसत. एकदा ते अभ्यास करत होते. जवळून एक लग्नाची वरात वाजत गाजत गेली. दुसऱ्याने एकाने आल्यावर विचारलं, "अरे इथून वरात गेली का?" त्या वेळेला स्वामी विवेकानंद म्हणाले "मी अभ्यास करत होतो. मला माहीत नाही वरात गेली की नाही"

 एकदा ते घरामध्ये अभ्यास करत असताना एक दिवस झाला, दोन दिवस झाले, बाहेरच आले नाहीत. तिसऱ्या दिवशी त्यांच्या मित्रांनी जाऊन बघितलं, तर हे बेशुद्ध पडलेले होते. त्यांच्या टेबलवर मित्रांनी त्यांना हालवून जागे केले. ते सलग तीन दिवस काही न खाता काही न पिता वाचन करीत बसले होते आणि वेगवेगळ्या मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास करून शेवटी शरीरातला थकवा आल्यामुळे ते त्या ठिकाणी मुर्छित झाले होते. एवढा त्यांचा अभ्यासावर फोकस होता.

 शिकागोच्या धर्म परिषदेनंतर तिथल्या एका ग्रंथालयामध्ये स्वामीजी जायचे. रोज सकाळी एक ग्रंथ घ्यायचे आणि संध्याकाळी नेऊन परत करून दुसरा आणायचे. तेव्हा तो ग्रंथपाल म्हणाला, "अरे तू काय चेष्टा करतोय का? तू पुस्तक वाचत नसेल तर नेतोच तरी कशाला? पुस्तकं नेतोस आणि संध्याकाळी परत आणतोस." त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणाले, "असं नाही मी पुस्तकं नेतो आणि वाचतो सुद्धा." ग्रंथपालाने म्हटलं, "ठीक आहे तुझी परीक्षा घेतो." आणि त्या ग्रंथापलाने स्वामीजींनी त्या महिनाभरात नेलेली 30 दिवसांची तीस पुस्तके काढली आणि त्यांना तिथले प्रश्न विचारले. त्याला स्वामी विवेकानंद आणि त्या प्रश्नांची उत्तरं दिलीच. परंतु कोणता प्रश्न कोणत्या पुस्तकातल्या किती नंबरच्या पानावरून विचारला, हे सुद्धा त्यांना सांगितलं.

स्वामीजींच्या अंत:करणांमध्ये करुणा भरलेली होती. अमेरिकेमध्ये असताना ते एका उद्योगपतीच्या घरी गेले. त्यांची थाटामाटात सरबराई केली. त्यांना झोपण्यासाठी सुंदर बेड वगैरे दिला. त्या बेडवर झोपताना मात्र त्यांना आठवलं की, अरे आजही माझी आई साध्या बेडवर आणि खाली झोपते. माझ्या देशातले असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना स्वप्नात सुद्धा गादी पाहायला मिळत नाही. असं सगळं असताना मी बेडवर झोपणं बरं नाही. ते लगेच ते बेडवरून उतरले आणि साधी सतरंजी अंथरून खाली जमिनीवर झोपले. त्यानंतर ते कधीही कोणाच्या घरी मुक्कामाला गेले नाहीत. मुक्कामाला गेले तरी चटईवर झोपलेत. शक्यतो कार्यक्रम झाला की, ते मठांमध्ये येऊन पुन्हा आपल्या साधेपणाने झोपायचे.

 त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर प्रचंड होता. एकदा त्यांचे प्राध्यापक त्यांच्यासोबत होते. एका रेस्टॉरंटमध्ये ते जेवायला बसले. त्यांना तो इंग्रजी गृहस्थ म्हणाला, "डुक्कर आणि राजहंस एकत्र बसून जेवत नाहीत." स्वामीजी म्हणाले, "ठीक आहे,मग मग मी उडून जातो."  आणि ते दुसर्या टेबलवर जाऊन बसले. ब्रिटिश माणसाला अगदी अपमानित झाल्यासारखं वाटलं. ते पुन्हा स्वामींना अपमानित करण्याचा करण्याची संधी शोधू लागले.

 वर्गात स्वामी विवेकानंद असताना त्यांनी स्वामी विवेकानंदांना उभं केलं. विचारलं, "सांग बरं तुला रस्त्यामध्ये दोन बॅगा भेटल्या. एका बॅगामध्ये बुद्धी आणि दुसर्या बॅगेमध्ये धन आहे. तू कोणती बॅग घेशील.? स्वामीजी म्हणाले, "मी पैशाची बॅग घेईल." प्रोफेसर हसायाला लागले. स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, "तुम्ही कोणती बँक घ्याल?" प्रोफेसर म्हणाले "मी अर्थातच बुद्धीची बॅग घेईल." स्वामी विवेकानंद म्हणाले, "बरोबर आहे ज्याच्याकडे जी गोष्ट नसेल, तो तीच घेईल. माझ्याकडे बुद्धी आहे, त्यामुळे मी धन घेईल. तुमच्याकडे बुद्धी नाही त्याच्यामुळे तुम्ही बुद्धी घ्या" सगळा वर्ग हसायला लागला. त्या प्राध्यापकाचा पुन्हा अपमान झाला.

 पुन्हा तो प्राध्यापक संधी शोधू लागला की, आता कशी स्वामीजींची जिरवायची. एकावेळी त्याने परीक्षा घेतली. त्यांनी स्वामीजींचा सगळा पेपर तपासला, पण गुण मात्र दिले नाहीत. आणि खाली पेपरच्या शेवटी लिहिले इडीयट. तो पेपर सगळ्या वर्गाला दाखवून त्याच्यासमोर घेऊन स्वामीजी गेले आणि त्याला म्हणाले, "प्राध्यापक महाशय, आपण पेपर तपासलाय. खाली तुमची सही सुद्धा आहे. परंतु तुम्ही मार्क द्यायला विसरलात." त्यावेळेस सुद्धा वर्ग खो-खो असल्याने त्या प्राध्यापकाची पुरती खोड मोडली. अशा प्रकारे त्यांचा प्रत्येक बाबतीमध्ये विनोद बुद्धी ही जागी असायची

एकदा इंग्लंडच्या पंतप्रधानाने त्यांना जेवायला बोलावलं. काटे आणि चमच्याने सगळे जेवत होते. असे स्वामीजींनी सरळ सरळ आपल्या हाताने खायला सुरू केले. त्या पंतप्रधानाला थोडं वाईट वाटलं. ते म्हणाले, "हा सगळा सुशिक्षितांचा समाज आहे. आपण काय गावंढळासारखे हाताने खाताय?" स्वामीजींनी त्यांना उत्तर दिलं, " तुमच्याकडे लोक काटे चमच्याने खातात. ते ठीक आहे. मी माझ्या हाताने का खातो, कारण माझे हात दुसऱ्या कोणीही आतापर्यंत खाण्यासाठी वापरले नाहीत. म्हणजे माझे हात उष्टे झालेले नाहीयेत. तुमचे काटे चमचे उष्टे असू शकतात." प्रधानमंत्र्याला सुद्धा लाज वाटली असणार की आपण काट्या चमच्याने खातो आहोत.

स्वामीजी जशास तसे उत्तर देत. एक प्रसंग असाच आहे. ते रेल्वेमधून प्रवास करत होते. त्या रेल्वेमध्ये दोन-तीन इंग्रजी मुली घुसल्या. त्यांना स्वामीजींची चेष्टा करण्याची लहर आली. त्यावेळेला त्या म्हणाल्या, "तुझ्या हातातलं ते सोन्याचे घड्याळ आम्हाला काढून दे, नाहीतर आम्ही ओरडून सांगू की हा साधू आमची छेड काढतोय." स्वामीजींनी त्यांचं ऐकलं आणि बहिरेपणाचा आव आणला. त्यांनी त्यांना खुणेने सांगितलं की, "मी बहिरा आहे. मला ऐकायला येत नाही. तुम्ही एक काम करा जे काय म्हणताय, ते लिहून द्या. मग मी तसं करतो." त्यांना वाटलं की, अरे हा साधू बहिरा आहे. परंतु याला वाचता येते.  त्यांनी लिहून दिलं, "तुझ्या हातातले घड्याळ काढून दे जर दिली नाहीस, तर आम्ही ओरडून सांगू की,  हा साधू आमचे छेड काढतो आहे." स्वामी विवेकानंद आणि तिची खिशात ठेवली आणि मग म्हणाले , "आता ओरडा" इतकी त्यांची बुद्धी तल्लख होती.

 एकदा रेल्वेतूनच प्रवास करत असताना सोबत एक ब्रिटिश अधिकारी होता. त्या अधिकाऱ्याला वाटले हा साधू आहे. कशाला माझ्या शेजारी बसलाय? त्याला राग आला. स्वामीजी थोडेसे डोळा लागला होता. त्याने स्वामीजींचा एक बूट घेतला आणि रेल्वेच्या खिडकीतून फेकून दिला. त्यांना ते झोपेत जाणवलं की, याने आपला बूट बाहेर फेकला आहे. थोड्यावेळाने स्वामीजींना जाग आली. तेवढ्यात तो ब्रिटिश अधिकारी झोपून गेला. स्वामीजींनी त्याची टोपी आणि कोट काढला आणि खिडकीतून फेकून दिला. थोड्यावेळाने त्या ब्रिटिश अधिकाऱ्याची झोप झाल्यानंतर त्याने बघितलं, आपला टोपी आणि कोट गायब. त्याने स्वामीजींना विचारलं, " माझी टोपी आणि कोट बघितले आहेत का?"स्वामीजी म्हणाले, "हो" "कुठे आहे." अधिकार्याने विचारले. स्वामीजी म्हणाले, "जिथे माझा बूट जिथे आहे, ना तिथे. कोट आणि टोपी त्या बुटाला शोधायला गेले आहेत." अशा प्रकारचे त्यांची विनोद बुद्धी तल्लख होती. ते जशास तसे उत्तर देत.

शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांचे भाषण पहिल्यांदा होणार होते. परंतु स्वामी विवेकानंद संन्याशाच्या वेश्यामध्ये तिथे गेल्यामुळे त्यांनी म्हटले, अरे हा काय संदेश देणार. आपला प्रोटोकॉल म्हणून याने कोट टोपी घातली नाही. याला शेवटी बोलायला देऊ. म्हणून शेवटचा एक मिनिट स्वामी विवेकानंदांना बोलायला दिलं. आयोजकांच्या मनात होते की, शेवटी लोक निघण्याच्या तयारीत असतील. त्यावेळेला याचं कोण ऐकणार आहे? म्हणजे याचं भाषण फेल होईल. अशावेळी सुद्धा स्वामी विवेकानंद शेवटी उठून बोलायला राहिले. एक मिनिट नाही, अर्धा तास नाही, एक तास नाही पूर्ण दीड तास स्वामी विवेकानंद बोलत होते. लोक मिनिटाला उठून उभे राहून टाळ्यांचा गजर करत होते. दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या सुप्रसिद्ध नॅशनल हेरॉल्ड नावाच्या वर्तमानपत्रांमध्ये अशी बातमी होती की, "सगळ्या धर्मपंडितांनी भाषणे केले असतील परंतु त्या सर्व भाषणांचा शिरोमणी आणि सर्वश्रेष्ठ भाषण जे झालं असेल ते एका हिंदू संन्याशाने केलेले आहे." त्यानंतर संपूर्ण विश्वामध्ये भारताच्या संस्कृतीचा, वेदांचा, उपनिषदांचा, सनातन धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा डंका अखंडितपणे वाजायला लागला. तो आजही वाजतो आहे.

त्यांच्याबाबत नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी असं म्हटलं की, "जर आज स्वामी विवेकानंद जिवंत असते, तर मी आयुष्यभर त्यांच्या पायाशी बसून राहिलो असतो." रवींद्रनाथ टागोर यांनी असे म्हटले की, "ज्यांना भारतीय संस्कृती जाणून घ्यायची आहे, त्यांनी स्वामी विवेकानंदांना वाचलं पाहिजे"

 भारत म्हणजे डोंबार्यांचा, गळ्यात साप घालून फिरणाऱ्यांचा, भिकाऱ्यांचा, साधूंचा देश अशी जी संकल्पना होती ती बदलण्याचं पहिलं काम स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे. भारत हा विश्वगुरू आहे, हे अख्ख्या जगाला पटवून दिलेलं आहे. अशा स्वामी विवेकानंदांना युवा दिनाच्या निमित्ताने खूप खूप नमस्कार. धन्यवाद.

रमेश वाघ, नाशिक

संपर्क - ९९२१८१६१८३

Post a Comment

Previous Post Next Post